लोकशिक्षक रामकृष्णदादांचे सेवाकार्य समाजासाठी भूषणावह : डॉ. कोमल ठाकरे

व्यायाम मंदिर, वाचनालय, प्रकाशनासह संस्कार व सांस्कृतिक चळवळींच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला दिली दिशा; ९६व्या जयंतीनिमित्त ग्रामगीता गौरव सन्मान सोहळा

तिवसा प्रतिनिधी  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि भाऊसाहेब देशमुख यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आद्यग्रामगीताचार्य श्री. रामकृष्णदादा बेलूरकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केलेले सर्वांगीण ग्रामीण विकासाचे सेवाकार्य समाजासाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूरचे अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे यांनी केले.

                       श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि आद्यग्रामगीताचार्य श्री. रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त (दि. ४ सप्टेंबर २०२६) आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी श्री. बाबाराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रचारप्रमुख श्री. गोपाल कडू, वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेच्या सदस्या सौ. छायाताई दंढाळे, कविवर्य श्री. बळवंत भोयर (नागपूर), ‘वरूड केसरी’चे संपादक श्री. प्रवीण सावरकर (वरूड) आणि श्री. नारायण निखाते, तळेगाव शामजीपंत उपस्थित होते.

                         डॉ. ठाकरे म्हणाले की, वरखेड हे रामकृष्णदादांचे जन्मगाव असले तरी त्यांच्या कार्याचा प्रभाव संपूर्ण ग्रामीण समाजावर पडला. युवकांच्या शारीरिक विकासासाठी व्यायाम मंदिर, बौद्धिक उन्नतीसाठी वाचनालय, प्रतिभावान साहित्यिकांच्या ग्रंथप्रकाशनासाठी माणिक प्रकाशन, बालसुसंस्कार शिबिरे, कीर्तन-प्रवचन, नाटके, कला-संस्कृती आणि युवक शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी गावाला सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिले.

ग्रामगीता गौरव सन्मान

                         कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते डॉ. कोमल ठाकरे यांचा रामकृष्णदादांच्या ग्रंथसंपदेसह शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रामगीता गौरव सन्मान सोहळ्यात माजी गटशिक्षणाधिकारी श्री. दिलीप बुंरंगे, माजी उपमुख्याध्यापक श्री. प्रदीप पाटील (वरूड), आरोग्यसेवा क्षेत्रातील श्री. अरुण गुलाबराव गंधै (नागपूर), शेती पत्रकार पुरस्कारप्राप्त श्री. हेमंत निखाडे (तिवसा), माजी मुख्याध्यापिका सौ. मंगला अतुल देशमुख (वरखेड), आदर्श शिक्षिका सौ. शारदा गणेश शेंडे (जांभोरा), श्री. बाबाराव गेडाम (राळेगाव), ग्रामगीताचार्य श्री. निळकंठ कळंबे (नागपूर), डॉ. श्री. भूषणराव पाटील (तिवसा) आणि कविवर्य श्री. अंजानदास मारथुरकर (जबलपूर) यांचा स्मृतिचिन्ह व राष्ट्रसंतांचे साहित्य देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी ग्रामगीता पाठांतर स्पर्धेतील तीन विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच सुधाकर राऊत लिखित ‘उतरंड’ आणि दिलीप ठाकरे लिखित ‘प्रार्थना भजन गीत’ या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमात ह.भ.प. श्री. निलेश महाराज गावंडे, ग्रामगीताचार्य यांनी काल्याचे कीर्तन सादर केले. जयंती सोहळ्याचे प्रास्ताविक श्री. माणिकदादा बेलूरकर, सूत्रसंचालन श्री. सुरेंद्र बेलूरकर, तर आभार श्री. दिलीप मोहेकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. आदेश सुभाष धुर्वे, मुकुंद पुनसे, सागर भोवते, भारती बेलूरकर, वंदना हरणे, सुधाकर वाघ, अरुण बावने, उद्धव बेलूरकर, राजू सैनीक, प्रकाश बारबुध्दे आणि दिनकर बोके यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

समाजासाठी संदेश

                        रामकृष्णदादांचे कार्य हे केवळ एका व्यक्तीचे चरित्र नसून ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श आहे. शिक्षण, संस्कार, साहित्य, व्यायाम, कला आणि सामाजिक प्रबोधन यांचा समन्वय साधला तर गावाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते—हीच त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळते.

0
0

Leave a Reply

Realted News