उत्तर नागपूर शाखेच्या पंधरवाडी सभेत कार्यकर्त्यांचा सत्कार; विविध उपक्रमांचे ठराव मंजूर
नागपूर : प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सभेला कार्यकर्त्यांची असलेली उपस्थिती आणि त्यांच्यातील ऊर्जा ही वैचारिक बांधिलकीतून निर्माण होते, असे प्रतिपादन रामभाऊ डोंगरे यांनी केले.
जागृत नगर येथील सुदत्त बौद्ध विहारात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उत्तर नागपूर शाखेची पंधरवाडी सभा अध्यक्ष डॉ. विभुतीचंद्र गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी डॉ. गजभिये यांना २५ वर्षांच्या समाजसेवेची दखल घेत नेल्सन मंडेला २०२६ पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच वंदना लांजेवार यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शाखेतर्फे सत्कार करण्यात आला.

संविधान गुणगौरव परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गौतम धोंगडे, संजय वालदे, सुनीता सहारे, वीणा कोठारे, भूपेंद्र पाटील, चैतन्य इंगळे, तक्षील पाटील, मयुरी सूर्यवंशी, सक्षम पाटील, गुंजन चोपडे, आरव वाघ, सिया वाघ, प्रगती वाघमारे, सुजाता वाघमारे आणि शांतनु जिभेकर यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरव करण्यात आला. केंद्रप्रमुख वर्षा साहारे यांचाही सन्मान करण्यात आला.
सभेत साळवा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर दिवसभराचा जनजागृती कॅम्प घेणे, ‘जयंती’ चित्रपटाचे सामूहिक प्रदर्शन, ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’चे वर्गणीदार वाढविणे तसेच १० व ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे ठराव मंजूर करण्यात आले.
प्रारंभी प्रा. सुनीता वासनिक यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी रामभाऊ डोंगरे, नरेश महाजन, डॉ. विभुतीचंद्र गजभिये आणि वंदना लांजेवार यांनी विचार मांडले. संचालन वर्षा साहारे यांनी केले, तर मयुरी सूर्यवंशी यांनी आभार मानले.

यावेळी चंदा मोटघरे, कामिनी बनकर, विवेक निमगडे, अशोक बोंदाडे, सुभाष टेंभुर्णे, अशोक रंगारी, एस.एन. उके, सुधाम बोदेले, सखाराम मेश्राम, अल्का लाडे, शारदा मोटघरे, वर्षा चव्हाण, शारदा खोब्रागडे, अशोक राऊत, रमेश ढवळे, शोभा तिरपुडे, वर्षा टेंभेकर, माया बोंदाडे, नालंदा पजारे, लिंता लाले यांच्यासह शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
समाजासाठी संदेश
अंधश्रद्धेला विरोध हा केवळ एखाद्या प्रथेचा विरोध नसून वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानिक मूल्ये आणि विवेकवादी विचारांचा स्वीकार आहे. प्रश्न विचारणे, सत्य पडताळणे आणि पुराव्यावर विश्वास ठेवणे हीच समाजाला प्रगत आणि सक्षम बनविण्याची दिशा आहे.











