‘चाकणकरांचा राजीनामा नव्हे, हकालपट्टीच’
चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे,
सुषमा अंधारेंचा तीव्र आरोप, राजकीय वातावरण तापले
मुंबई : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे.
फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून अंधारे यांनी चाकणकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “हा राजीनामा नसून हकालपट्टीच आहे,” असा थेट आरोप केला. चाकणकरांनी नैतिकतेच्या आधारावर प्रकरण उघडकीस आल्यानंतर तत्काळ किंवा काही दिवसांपूर्वीच स्वेच्छेने पदत्याग करायला हवा होता, मात्र त्यांनी शेवटपर्यंत पद टिकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.
याचबरोबर, या प्रकरणात अधिक कठोर भूमिका घेत अंधारे यांनी चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. केवळ राजीनामा देऊन जबाबदारी संपत नाही, तर प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अंधारे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसनेही लक्ष वेधले आहे. “मोठेमोठे गार केले गंमतमधी…” या एका ओळीच्या स्टेटसद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे चाकणकरांवर टीका केली असून, हे स्टेटस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

अशोक खरात प्रकरणामुळे खळबळ
दरम्यान, अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर १८ मार्च रोजी पहाटे त्याला अटक करण्यात आली.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त असून, ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ व अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याने ओळख निर्माण केली होती. अनेक राजकीय नेते व सेलिब्रिटी त्याच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे हे प्रकरण अधिकच गाजत आहे.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0