तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघिणीचा हल्ला; ४ महिलांचा मृत्यू
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलातील दुर्दैवी घटना; वनविभागावर प्रश्नचिन्ह
चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या गटावर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात ४ महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत असून जंगलावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही गावातील १३ महिला शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजता तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. काम सुरू असताना अचानक वाघिणीने त्यांच्या गटावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये घबराट पसरली आणि त्या जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागल्या. मात्र, वाघिणीने चार महिलांवर झडप घालून त्यांचा बळी घेतला.
घटनेनंतर महिलांपैकी एक महिला कसाबसा जीव वाचवत गावात पोहोचली आणि गावकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे चार महिलांचे मृतदेह आढळून आले.

मृतांमध्ये कवडूबाई दादाची मोहुर्ले (४५), अनुबाई दादाजी मोहुर्ले (४६), संगीता संतोष चौधरी (३६) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (३३) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
वनविभाग घटनास्थळी; गस्त वाढविण्याचे आश्वासन
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराचा आढावा घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला असून नागरिकांनी जंगल परिसरात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित भागात गस्त वाढविण्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
गतवर्षीही अशाच हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू
सिंदेवाही तालुक्यातीलच मेंढा (माल) जंगल परिसरात गतवर्षी १० मे रोजी तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघाने हल्ला केला होता. त्या घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
‘हा प्रशासकीय अनास्थेचा परिणाम’ – विजय वडेट्टीवार
या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रकार केवळ दुर्घटना नसून प्रशासकीय अनास्थेचा परिणाम असल्याचा आरोप केला. जंगलावर अवलंबून असलेल्या गरीब आणि कष्टकरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार आणि वनविभागाने ठोस उपाययोजना करण्यात अपयश आल्याची टीका त्यांनी केली.
पीडित कुटुंबांना भरीव मदत द्यावी – रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृत महिलांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच मानव–वन्यप्राणी संघर्ष रोखण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.









