२ मे पासून संत लटारे महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ
भागवत कथा, दिंडी स्पर्धा व महाप्रसादाचे आयोजन
का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल
कारंजा (घा) : कारंजा नगरीचे ग्रामदैवत श्री संत विनायक उर्फ लटारे महाराज यांच्या ६१ व्या पुण्यतिथी महोत्सवाला दिनांक २ मेपासून प्रारंभ होत आहे. या निमित्ताने २ मे ते ९ मे दरम्यान श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कथा सप्ताहात ह.भ.प. श्री साधक संजीवजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून दररोज दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत कथा सादर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून भाविकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.
महोत्सवाच्या कालावधीत दैनंदिन पूजापाठ, अभिषेक, काकड आरती, महाराजांची आरती, भागवत कथा, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रीमद भागवत ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर कथा सप्ताहाला सुरुवात होईल.
तसेच, ८ मे रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत भव्य वारकरी दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचा समारोप ९ मे रोजी महाप्रसादाने होणार आहे.
दरम्यान, पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मार्गांवर आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात येत असून, श्री संत लटारे देवस्थान व भाविकांकडून जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.









Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0