राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह

राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह; किल्ले शिवनेरीवर भव्य शिवजन्मोत्सव सोहळा

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरी होत आहे. शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी येथे पहाटेपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली असून ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.

शिवनेरीवरील मुख्य शासकीय सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. यावेळी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवरायांना अभिवादन केले.

शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर, विशेषतः शिवजन्मस्थळ परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ऐतिहासिक वारसा जपत गडावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून या मंगलमय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो शिवभक्त शिवनेरीवर दाखल झाले.

 

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी प्रथमच शासकीय व्यासपीठावरून मनोगत व्यक्त केले. भाषणादरम्यान त्या भावूक झाल्याचे दिसून आले. राज्यातील शेतकरी व कष्टकरी जनतेला सुखी-समाधानी ठेवण्याचे सामर्थ्य दे, अशी प्रार्थना त्यांनी आई शिवाई देवीच्या चरणी केली. शिवरायांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, शपथविधीच्या वेळी त्यांच्या डोळ्यांसमोर जिजाऊ माँसाहेबांचा आदर्श होता. जिजाऊंनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर स्वराज्याची प्रेरणा आणि संकटांशी सामना करण्याची ताकद दिली, असे त्यांनी सांगितले. शिवरायांच्या जन्मभूमीवर बोलताना अंगावर काटा येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात शिव–शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची ठाम भूमिका मांडली. आदरणीय दादांनी आयुष्यभर जपलेल्या मूल्यांचा वारसा कधीही सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अजित पवार यांचाही उल्लेख करत शिवनेरी किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

महायुती सरकार राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध असून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भावनिक आवाहन आणि कर्तव्यभावना यांचा संगम असलेल्या या भाषणामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

0
0

Leave a Reply

Realted News