वर्ध्यात खळबळ! शेतमजुराचा निर्घृण खून; मालकच निघाला खुनी
का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल
कारंजा (घा.) | वर्धा – गारपीट–धामकुंड रोडवर सापडलेल्या एका इसमाच्या मृतदेहामागील सत्य समोर आल्यानंतर संपूर्ण परिसर हादरला आहे. साध्या कामाच्या वादातून शेतमालकानेच आपल्या मजुराचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मृत व्यक्तीची ओळख संजय गोविंदराव जाधव अशी असून तो गेल्या पाच वर्षांपासून आरोपीच्या शेतात मजुरी करत होता. काही दिवसांपासून कामावरून सुरू असलेल्या वादाचा शेवट थेट खुनात झाला.
२८ मार्चच्या रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी मंगेश तायवाडे (रा. धामकुंड) आणि संजय जाधव शेतात असताना “काम का केलं नाही?” या कारणावरून जोरदार वाद झाला. रागाच्या भरात मंगेशने संजयच्या चेहऱ्यावर बेदम बुक्क्यांचा मारा केला. गंभीर जखमी झालेल्या संजयचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह आपल्या स्कॉर्पिओ गाडीत टाकून गारपीट–धामकुंड रोडलगत टाकून दिला, जेणेकरून गुन्हा लपवता येईल. मात्र हा प्लॅन फार काळ टिकला नाही.
‘अति घाई’नेच उघड झाला गुन्हा
घटनास्थळी आरोपी स्वतःच वारंवार “लवकर आरोपीला अटक करा” असा आग्रह करत होता. यामुळे संशय निर्माण झाला. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी विजय गोविंदराव जाधव (रा. गारपीट) यांच्या तक्रारीवरून कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
कामाच्या किरकोळ कारणावरून एवढा भीषण शेवट झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे. क्षणिक राग किती भयंकर परिणाम घडवू शकतो, याची ही धक्कादायक उदाहरण ठरत आहे.









