का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल
उड्डाणपुलावरील पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी
कारंजा (घाडगे) : कारंजा शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपूल आणि सर्विस रोडवरील पथदिवे तसेच हायमास्ट दिवे मागील १५ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे तातडीने दिवे सुरू करण्याची मागणी केली आहे.
परिसरात अंधाराचे साम्राज्य, नागरिक त्रस्त
उड्डाणपूल परिसरातील पथदिवे बंद असल्यामुळे संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. पुलाखालून व अंडरपासमधून दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत असून अपघात व सुरक्षेच्या समस्या निर्माण होत आहेत.
अनेक वसाहतींवर परिणाम
उड्डाणपुलाच्या पलीकडे असलेल्या वार्ड क्रमांक १५, १६ व १७ मधील वस्ती, खैरी पुनर्वसन परिसर तसेच भालेवाडी-दाभा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांचा या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वापर असतो. या सर्व भागांतील नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अंडरपास आणि सर्विस रोडवर धोकादायक परिस्थिती
पुलाखालील अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात अंधार असून वार्ड क्रमांक १४ मधील नागरिकांना सर्विस रोडने प्रवास करताना धोका निर्माण होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पथदिवे नियमित सुरू ठेवणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
तहसीलदारामार्फत निवेदन सादर
या समस्येबाबत कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन सादर केले आहे. निवासी नायब तहसीलदार एस. एम. टिपरे यांनी हे निवेदन स्वीकारले.

लवकरात लवकर कार्यवाहीची अपेक्षा
सदर समस्येची तातडीने दखल घेऊन उड्डाणपूल व सर्विस रोडवरील पथदिवे सुरू करण्यात यावेत, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून लवकरच कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.









