कळमेश्वर | प्रतिनिधी
इंदिरा गांधी महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्धा
कळमेश्वर येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पुणे येथील (बार्टी) अंतर्गत समतादूत प्रकल्प आणि समाज कल्याण विभाग, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन आणि विद्यापीठ गीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे उपस्थित होते.
स्पर्धेचे विषय ‘महात्मा फुले यांचे समाजविकासातील योगदान’, ‘मजूर समस्या’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे होते. या स्पर्धेत एकूण नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत कुमारी तनुश्री राजेंद्र चौधरी यांनी प्रथम क्रमांक, तर सलोनी चेतन बागडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

विजेत्या स्पर्धकांना संविधान उद्देशिकेची प्रत व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंजुषा निस्ताने यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. किशोर दुर्गे यांनी मानले.
यावेळी कळमेश्वर तालुका समतादूत कुंदा बोरकर यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महामानवांच्या विचारांवर प्रकाश टाकला.
या उपक्रमासाठी बार्टीच्या महासंचालक दीपाली मुधोळ मुंडे, विभागप्रमुख डॉ. बबनराव जोगदंड, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. सुमेध थोरात, साहाय्यक आयुक्त (नागपूर) सुकेशिनी तेलगोटे आणि जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले.











